पुणे: गुजरात येथील अहमदाबाद येथून पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला तब्बल २२,९१,५३४/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा
पुणे: गुजरात येथील अहमदाबाद येथून पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला तब्बल २२,९१,५३४/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा
akshayपुणे: गुजरात येथील अहमदाबाद येथून पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला तब्बल २२,९१,५३४/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात नऱ्हे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स बस चालकासह माल विकत घेणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे.
नऱ्हे पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण आणि पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्या पथकाने नवले ब्रिजखाली सापळा रचला. संशयास्पद ट्रॅव्हल्स बस थांबवून तिची तपासणी केली असता, त्यामध्ये ५,९०,८००/- रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला, व्ही १ तंबाखू, आर एम डी पानमसाला, तुळशी तंबाखू आणि गोवा गुटखा आढळून आला.
पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक हबास मुबारक खान (वय ३४ वर्षे, रा. जिल्हा बाडमेर, राज्य राजस्थान) आणि हा माल स्वीकारणारा आरोपी सोहेल अस्लम मुलाणी (वय २२ वर्षे, रा. ६६७, गंजपेठ, पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी सोहेल मुलाणी याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केदारीनगर, पुणे येथील एका गोदामात (गोडाऊन) आणखी साठा लपवून ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तातडीने त्या गोदामावर धाड टाकून १७,००,७३४/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त केला. दोन्ही ठिकाणांहून मिळून एकूण २२,९१,५३४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, हा माल अहमदाबाद येथून खरेदी केल्याचे आरोपींनी सांगितले आहे.
याप्रकरणी आरोपींवर नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ - ३, पुणे शहर) सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (सिंहगड रोड विभाग) विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगताप, राजू तोरे, नितीन वाघमारे आणि निलेश भोरडे यांचा समावेश होता.